विहिरीत पडलेल्या मुलाला वाचवण्यासाठी बापाने मारली उडी, मात्र जे नको तेच घडलं…

पुणे | अनर्थ घडत असल्याचे समोर दिसत होते. मुलगा विहिरीतील पाण्यात आकांताने ओरडत होता. पोटच्या लेकराला वाचवण्यासाठी बापाने उडी घेतली, लेकाला घट्ट मिठी मारून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या बापलेकांची ती केविलवाणी मिठीही मुलाला वाचवू शकली नाही. जीव वाचवण्यासाठी मारलेली ती मिठी बापलेकांची शेवटची मिठी ठरली आणि विहिरीत बुडून दोघांचाही दुर्दैवी अंत झाला.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील एकुरका येथे ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. विहिरीच्या काठावर चप्पल, विहिरीच्या पाण्यावर तरंगणारे चॉकलेटचे कागद आणि चिप्सचा पुडा आढळून आला. यावरूनच परिसरातील नागरिकांना काहीतरी अघटीत घडल्याचा संशय आला. अधिक शोध घेतला असता पाण्यात बुडालेल्या अवस्थेतील बापलेकांचा मृतदेह आढळून आला. सोनू उर्फ रोहन नटराज धस (वय १३) तर नटराज रामहरी धन (वय ३३) अशी या दुर्दैवी बापलेकांची नावं आहेत.

या घटनेची अधिक माहिती अशी की, रोहन हा चौथीच्या वर्गात शिकत होता. शाळा सुटल्यानंतर रोहन त्याच्या वडिलांसोबत शेतात गेला होता. या भागात राजाभाऊ धस यांचेही शेत आहे. या शेताला माळ म्हणून ओळखले जाते. त्या शेतात राजाभाऊ धस यांची विहीर आहे. रोहन या विहिरीत पाणी पिण्यासाठी उतरला मात्र त्याचा पाय घसरला आणि तोल जाऊन तो पाण्यात पडला.

रोहन पाण्यात गटांगळया खात ओरडत असल्याचे वडील नटराज यांना निदर्शनास आले. त्यांनी तातडीने विहीरीच्या दिशेने धाव घेतली. लेकराला वाचवण्यासाठी विहीरीत उडी मारली. मात्र घाबरलेल्या रोहनने नटराज यांच्या गळ्याला मिठी मारली. परिणामी नटराज यांना हालचाल करता येईना आणि त्यामुळे दोघंही बुडायला लागले. विहिर परिसरात मदतीसाठी कुणीच उपलब्ध नसल्याने बापलेकांना योग्य मदत मिळाली नाही. काहीवेळातच बुडून त्यांचा मृत्यू झाला. रात्री उशीरापर्यंत रोहन आणि नटराज घरी न आल्याने त्यांची शोधाशोध सुरू झाली.

नातेवाईंकांनी शेतात जाऊन पाहिले असता राजाभाऊ धस यांच्या विहिरीच्या कडेला चप्पल तर विहीरीच्या पाण्यावर चॉकलेटचे कागद दिसले. गावकऱ्यांना विहीरीत शोध घेतला. त्यासाठी मुरूड येथून एका व्यक्तीला बोलवून आणले. विहीरीत गळ टाकल्यानंतर रोहन आणि नटराज यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. यावेळी रोहन व नटराज यांच्य नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी पोलिस पथकाला पुढील तपास करण्यासाठी बोलवून घेतले. नटराज आणि रोहन यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहेत. मात्र मुलाला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणाऱ्या बापासह मुलाचा अंत झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *