धक्कादायक | रागीट बापाच्या हल्ल्याची मुलगा मोजतोय किंमत… ७ वर्षीय मुलाची प्रकृती गंभीर; संपुर्ण प्रकार पाहून डोळयात पाणी येईल

लातूर| कुटुंबातील एक व्यक्ती जरी रागीट किंवा तापट असेल तर त्याचे परिणाम साऱ्या कुटुंबाला भोगावे लागत असतात. अशा घटना आपण नेहमी आजूबाजूला पाहतो. रागाच्या भरात ती व्यक्ती इतकी अविचाराने वागते की आपण आपल्याच रक्ताच्या नात्यांतील माणसांवर हल्ला करत आहोत याचंही भान त्यांना राहत नाही.

अशा रागीट लोकांकडून कधी बायकोवर, आईवडीलांवर तर कधी निष्पाप मुलांवरही हात उगारला जातो. अशाच एका घटनेतील रागीट बापाकडून झालेल्या हल्ल्याची किंमत सध्या त्याचा ७ वर्षाचा मुलगा मोजत आहे. वडीलांनी केलेल्या हल्ल्यामुळे मुलाची प्रकृती गंभीर बनली आहे.

लातूर जिल्ह्यातील हणमंतवाडी या भागात ही धक्कादायक घटना घडली. जावई घरी आले म्हणून सासूने त्यांना पाणी दिले. सासूने दिलेलं पाणी प्यायल्यानंतर रागाच्या भरातच घरात आलेल्या जावयाने सासूवर धारदार शस्त्राने वार करायला सुरूवात केली. या हल्ल्यात सासू जागीच ठार झाली. यावेळी त्याचा सात वर्षाचा मुलगा तिथेच होता. घाबरलेल्या अवस्थेतील त्या मुलाने ओरडायला सुरूवात केली. मात्र कशाचेच भान नसलेल्या त्या मुलाच्या बापाने आपल्या पोटाच्या पोराचा निर्दयीपणे गळा चिरला.

यामध्ये मुलगा गंभीर जखमी झाला. मुलावर जीवघेणा हल्ला करून बापाने स्वता:ला जाळून घेतले. या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. रजनीकांत वेदपाठक असं त्या निष्ठूर बापाचं नाव आहे. तर त्या कार्तिक वेदपाठक असं या दुर्दैवी मुलाचं नाव आहे.

रजनीकांतचा पत्नीशी वाद झाल्याने त्याची पत्नी हणमंतवाडी येथील माहेरी निघून गेली होती. याच गोष्टीचा राग रजनीकांतच्या मनात होता. पत्नीसोबत झालेल्या वादातून जाब विचारण्यासाठी रजनीकांत सासूरवाडीच्या घरी पोहोचला. त्यावेळी रजनीकांतची पत्नी आणि मुलगी कामासाठी बाहेर गेल्या होत्या. तर घरात ५५ वर्षाच्या  सासू चंद्रसेना आणि मुलगा कार्तिक होता. जावई आल्याचे पाहून सासूने पाणी दिले. पाणी पिऊन रजनीकांत काहीवेळ टीव्ही पाहत बसला होता.

दरम्यान पत्नीसोबत झालेल्या भांडणाचा राग त्याच्या मनात होताच. सोबत कोयतासदृश्य हत्यार घेऊन तो आला होता. राग अनावर होताच काही कळायच्या आतच त्याने सासूच्या शरीरावर वार करायला सुरूवात केली. हा प्रकार पाहून बिथरलेला कार्तिक ओरडताच त्याच्या गळ्यावरही वार केला. सासू रक्ताच्या थारोळ्यात मृत होऊन पडली तर कार्तिक वेदनांनी विव्हळत होता. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करत रजनीकांत दुसऱ्या खोलीत गेला आणि त्याने स्वता:ला जाळून घेत आत्महत्या केली.

 

दरम्यान आरडाओरड ऐकून शेजाऱ्यांनी या घराकडे धाव घेताच त्यांना घडला प्रकार पाहून धक्काच बसला. चंद्रसेना यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर कार्तिक जीवाच्या आकांताने ओरडत होता. रजनीकांतचाही मृत्यू झाला होता. शेजाऱ्यांनी पोलिसांना खबर दिली. कार्तिकला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं.

सध्या कार्तिकवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर आहे. बाहेरून घरी आलेल्या रजनीकांतच्या पत्नीला हा प्रकार बघून जबरदस्त धक्का बसला. सध्या या घटनेचा पोलिस तपास करत आहे. पण पतीपत्नीच्या भांडणातून रागावर ताबा नसलेल्या बापाच्या हल्ल्यात कोवळ्या कार्तिकला मात्र वेदनांचे चटके बसत आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *