प्रदीप पटवर्धन यांनी नाटकाची तिकिटे ब्लॅकने विकली; विजय यांनी सांगितला तो किस्सा

मुंबई | मनोरंजन विश्वातील एखाद्या अभिनेत्याचा मृत्यू झाल्यानंतर चाहते त्या अभिनेत्याच्या आठवणींमध्ये रमतात. त्या कलाकाराने साकारलेल्या भूमिका, तसेच त्या कलाकाराच्या आयुष्यातील रंजक किस्से सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागतात. आज दिग्गज अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने चाहते आणि मराठी मनोरंजन विश्वास दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अशात आता त्यांच्या आयुष्यातील अनेक रंजक किस्से सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यातीलच एक किस्सा फारच भन्नाट आहे. कारण यामध्ये प्रदीप पटवर्धन यांच्यावर एक गंभीर आरोप करण्यात आला आहे. हा आरोप दुसरा तिसरा कोणी नाही तर त्यांच्या एका मित्रानेच केलाय. प्रदीप पटवर्धन यांचे मित्र विजय पाटकर यांनी एका मुलाखतीमध्ये एक मजेशीर किस्सा सांगितला होता.

मोरूची मावशी हे नाटक जेव्हा प्रगतीपथावर होते तेव्हा अनेक ठिकाणी या नाटकातील कलाकार मंडळींचा इंटरव्यू होत होता. यावेळी प्रदीप पटवर्धन आणि विजय पाटकर या दोघांनी “अस्सल पाहुणे इरसाल नमुने” या टॉक शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी विजय पाटकर यांनी एक रंजक किस्सा सांगितला.

ते म्हणाले की, ” मोरूची मावशी हे नाटक खूप गाजत होतं त्यावेळी प्रदीपने या नाटकाची काही तिकीट ब्लॅकने विकली होती. निर्माते सुधीर भट यांच्याकडून प्रदीप आधीच जास्तीची तिकिटे घेऊन ठेवायचा. नाटक सुरू होण्याआधी तो ही तिकीटे बाहेर ब्लॅकने विकायचा. आधीच रात्रीचा खेळ रंगलेला असायचा त्यात ही वरची कमाई हे कसं काय कुणाला सुचेल….?”

असं त्यांनी यावेळी सांगितलं होतं. शोमध्ये जेव्हा त्यांनी हा किस्सा सांगितला तेव्हा प्रदीप पटवर्धन यांच्या चेहऱ्यावर वेगळच हसू आलं. तसेच या शोमधील इतर व्यक्ती देखील हसू लागल्या. त्यावर प्रदीप पटवर्धन म्हणाले की, ” मोरूची मावशी हे नाटक माझ्या एन्ट्री नंतरच सुरू होत होतं. यावेळी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यापेक्षा मी बाहेर जाऊन ब्लॅकमध्ये तिकिटे कधी विकणार?” असा सवाल त्यांनी केला होता. निश्चितच विजय पाटकर यांनी सांगितलेला हा किस्सा खोटा होता. मात्र त्यावेळी या किस्स्याने चांगलीच खळबळ उडवली होती. आता हाच किस्सा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *