कॅन्सर सोबतची झुंज अपयशी; ३००हून अधिक चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्याचा अखेर मृत्यू

दिल्ली | मनोरंजन विश्वातून आणखीन एका तरुण अभिनेत्याचा मृत्यू झाला आहे. आसामी अभिनेता किशोर दास याचे काल (२ जुलै) रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. आसामी सिनेविश्वातील एक तरुण अभिनेता गेल्याने सर्वचजण हळहळ व्यक्त करत आहेत.

साल २०२१ मध्ये किशोरला कॅन्सर असल्याचे निदान झाले होते. तेव्हापासून तो या रोगावर उपचार घेत होता. मात्र नंतर त्याला अधिक त्रास होऊ लागल्याने मे २०२२ मध्ये त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. इथे त्याच्यावर तीन महिन्यांपासून उपचार सुरू होते. मात्र २ जुलै रोजी त्याची ही लढाई संपली.

कॅन्सर पीडित प्रत्येक व्यक्तीला किमो थेरेपी दिली जाते. यामध्ये त्या रुग्णाला बरे वाटते. मात्र किशोरच्या बाबतीत हे उलट ठरले. त्याला या थेरेपीमुळे अधिक त्रास होऊ लागला. याची माहिती त्याने स्वतः दिली होती.

मे महिन्यात जेव्हा त्याला चेन्नईमधील एका रुग्णालयात दाखल केले तेव्हा त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याची माहिती दिली होती. या काळात त्याला कोरोनाची देखील लागण झाली. त्यामुळे त्याची प्रकृती आणखी खालावली. कीमो थेरेपी विषयी सांगत असताना त्याने म्हटलं होतं की, ” मला या थेरेपीमुळे जास्त त्रास होत आहे. याचे मला साईड इफेक्ट झाले आहेत. तसेच मला उलट्या, चक्कर आणि अशक्तपणा जाणवतो आहे.”

अशात आता वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी त्याची ही झुंज संपली आहे. किशोर आसाम इंडस्ट्रीतल सर्वोत्तम कलाकारांपैकी एक होता. त्याने त्याच्या कारकिर्दीत ३०० हून अधिक लोकप्रिय म्युझिक व्हिडिओ बनवले आहेत. त्याचे ‘Turrut Turrut’हे गाणे मोठे लोकप्रिय ठरले होते.

‘बंधुन’ आणि ‘बिधाता’ या मालिकांमध्ये त्याने महत्त्वाची भूमिका साकारली होती. याशिवाय त्याने काही शॉर्टफिल्म्स देखील केल्या आहेत. किशोर ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ आणि ‘डांस इंडिया डांस’मध्ये एक स्पर्धक म्हणून झळकला होता.

‘मॉडेल हंट’मध्ये किशोर दास फर्स्ट रनर अप मध्ये आला होता. त्याच्या जाण्याने मनोरंजन विश्वाला आणि त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. खूप कमी वयात त्याने प्रसिध्दी मिळाली आणि खूप कमी वयात या जगाचा निरोप घेतला. मात्र त्याच्या अखेरच्या दिवसातही त्याच्या चेहऱ्यावर हसू कायम होते.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *