भारतीय महिला क्रिकेट आठव्यांदा अंतिम फेरीत; 74 धावांनी थायलंडवर केली मात

बांगलादेश | भारताच्या महिला संघाची आशिया कपमधील चमकदार कामगिरी सातत्याने बहरताना दिसत आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने महिला आशिया कपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. या संघाने गुरुवारी सिल्हेट येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात थायलंडचा 74 धावांनी पराभव केला. भारतीय संघाने निर्धारित 20 षटकात 6 बाद 148 धावा केल्या. यानंतर थायलंड संघाला 9 विकेट्सवर केवळ 74 धावा करता आल्या. सलामीवीर शेफाली वर्माच्या बॅटने तर फिरकीपटू दीप्ती शर्माच्या चेंडूने कमाल केली.

शेफालीने 150 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या – 18 वर्षीय शेफाली वर्मा ही मूळची हरियाणाची असून, तिने तुफानी फलंदाजी केली. तिने 150 च्या स्ट्राईक रेटने खेळताना 28 चेंडूत 42 धावा केल्या. यादरम्यान शेफालीने पाच चौकार आणि एक षटकार लगावला. तिने स्मृती मानधना (13) सोबत 38 धावांची सलामीची भागीदारी केली. यानंतर शेफाली आणि जेमिमा रॉड्रिग्ज (27) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 29 धावांची भागीदारी केली. जेमिमाने 26 चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने 27 धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरनेही चांगली कामगिरी करत 30 चेंडूंत चार चौकारांसह 36 धावांचे योगदान दिले. पूजा वस्त्राकर 13 चेंडूत 17 धावा करून नाबाद परतली.

थायलंड संघाचे सुरुवातीलाच ऑफस्पिनर दीप्ती शर्माने कंबरडे मोडले. 149 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना थायलंड संघाने 18 धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. यष्टिरक्षक एन कोंचारोएनकाई (5), चँथम (4) आणि सोनारिन टिपोच (5) यांना दीप्तीने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर रेणुका सिंगने चनिदा सुथिरुआंगला (1) बोल्ड करून संघाची धावसंख्या 4 बाद 21 अशी केली. भारताकडून दीप्ती शर्माने ४ षटकांत 7 धावा देत तीन बळी घेतले. गायकवाडने 10 धावा देत दोन गडी बाद केले. रेणुका सिंग, स्नेह राणा आणि शेफाली वर्मा यांनी 1-1 विकेट घेतली.

सलग आठव्यांदा फायनलमध्ये – भारतीय महिला संघाने सलगआठव्यांदा आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. या स्पर्धेचा हा आठवा हंगाम असून भारतीय महिला संघ प्रत्येक वेळी विजेतेपदाच्या लढतीत पोहोचला आहे. गेल्या मोसमात त्यांना बांगलादेशकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्याचबरोबर भारतीय महिला संघाने सहा वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *