मनोरंजन सृष्टी पुन्हा हादरली… बिगबॉस फेम अभिनेत्रीचा गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; मृत्यूबाबत शंका 

गोवा| गेल्या काही दिवसांमध्ये मनोरंजनसृष्टीला एका पाठोपाठ धक्के बसत आहेत. अनेक कलाकारांच्या निधनाच्या बातम्यांनी मनोरंजन विश्व हादरून गेलं आहे. यातच आता टिकटॉकस्टार, बिग बॉस स्पर्धक आणि भाजपची नेता सोनाली फोगाट हिचे वयाच्या ४२ वर्षी निधन झाल्याची बातमी धडकली आहे. गोव्यातील एका हॉटेलमध्ये सोनाली थांबली होती.

रात्रीचे जेवण घेतल्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागले आणि त्यातच तिला हृदयविकाराचा झटका आला. सोनालीच्या निधनाची बातमी कळताच तिच्या सोशलमीडियावरील लाखो फॉलोअर्स, चाहते आणि राजकीय क्षेत्रातील सहकाऱ्यांसह कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला आहे.

सोनालीचं आयुष्य तसं खूपच चढउतारांचं होतं. सोशलमीडियावर तिचा खूप चाहता वर्ग होता. टिकटॉक या माध्यमातून सोनाली लोकप्रिय झाली. तिचे व्हिडिओ हे मनोरंजन, प्रोत्साहन तर कधी विनोदी असायचे. सोनाली बिग बॉसच्या १४ व्या सीझनमध्ये झळकली आणि तिच्या लोकप्रियतेत अधिकच भर पडली. त्यापूर्वी सोनालीने काही सिनेमांमध्येही काम केलं मात्र ते सिनेमे फारसे चालले नाहीत.  मात्र अनेक मालिकांमधील सोनालीच्या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. सोशलमीडियावरील प्रसिध्दीमुळे सोनालीला हरियाणातून आमदारकीचे तिकीट मिळाल्यानेही वाद निर्माण झाला होता.

सलमान खान होस्ट करत असलेल्या बिग बॉसच्या १४ व्या पर्वात सोनाली सहभागी झाली होती. या सीझनमध्ये रूबीना दिलैकसोबत वाद झाल्यानंतर सोनालीने रूबीनाला जीवे मारण्याची धमकी दिल्याने ती पुन्हा चर्चेत आली. बिग बॉस शोमध्ये सोनालीने तिच्या खाजगी आयुष्याबद्दलचे अनेक किस्से उलगडले होते. पतीच्या निधनानंतर एक व्यक्ती तिच्या आयुष्यात आली होती, जी तिच्यापेक्षा ११ वर्षांनी लहान होती, मात्र ते नातं पुढे गेलं नाही असंही सोनालीने या शोमध्ये बोलताना सांगितलं होतं.

हरियाणातील आदमपूर विधानसभा संघातून तिने निवडणूक लढवली मात्र ती पराभूत झाली. कुलदीप बिश्नोई यांनी तिचा पराभव केला, मात्र बिश्नोई भाजपमध्ये आल्यानंतर त्यांच्यात चांगला संवाद सुरू झाला. सोनाली भाजपच्या महिला मोर्चाचं नेतृत्व करत होती. सोनालीचे पती संजय फोगाट हेदेखील राजकारणात सक्रिय होते. २०१६ मध्ये पती संजय यांचाही गूढरित्या मूत्यू झाला होता. सोनालीला १६ वर्षांची यशोधरा नावाची मुलगी आहे.

गोव्यात काही कामानिमित्ताने गेलेल्या सोनालीने सोमवारी रात्री एक व्हिडिओ शेअर केला होता. तसेच ती आईशी फोनवर बोलली तेव्हा तिला अस्वस्थ वाटत असून, कुणीतरी काहीतरी कट रचत असल्याची भावना बोलून दाखवली होती. त्यामुळे सोनालीचा मृत्यू नैसर्गिक नसून घातपात असल्याचा संशय सोनालीची बहिण रूपेश हिने व्यक्त केला आहे. त्यानुसार सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *