कसारा घाटात कार चालकाचा भीषण अपघातात मृत्यू, छगन भुजबळांनी…

कसारा | कसारा घाटातील अपघाताचे प्रमाण पुन्हा एकदा वाढले आहे. एका वाहनचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्याचा मोठा अपघात झाला आहे. एका मोठ्या वळणावर गाडी भरधाव वेगात होती. यावेळी वळण घेत असताना कार चालकाला गाडी नियंत्रित ठेवता आली नाही. यामुळे गाडीचा भीषण अपघात होऊन यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

सदर घटना शुक्रवारी दुपारी घडली. नाशिकहून मुंबईकडे ही कार येत होती. यावेळी ओहळची वाडी येथे पोहचले असता एक मोठे वळणं आहे. याच वळणावर हा भीषण अपघात झाला. कारमध्ये संजय मोरे नामक व्यक्ती होते. त्यांच्या गाडीचा वेग एवढा जास्त होता की, त्यांची गाडी वळणावर आल्यावर पलटी झाली आणि समोर असलेल्या नाल्यात पडली. गाडीचा यात चक्कचूर झाला आहे. यामध्ये संजय मोरे यांचे निधन झाले आहे.

घटनेची माहिती मिळाल्यावर मदत कक्ष व्यवस्थापनाची टीम आणि पोलिसांनी येथे धाव घेतली. यावेळी गाडीतून संजय यांना बाहेर काढत त्यांना टोल प्रशासनाच्या रुग्णवाहिकेतून कसारा शासकीय रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र इथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. यावेळी घटनास्थळी दत्ता वातडे,धर्मेंद्र ठाकूर, शाम धुमाळ आणि कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप गीते हे उपस्थित झाले होते.

घटना घडली तेव्हा व्यवस्थापन टीमचे दत्ता वातडे,धर्मेंद्र ठाकूर, शाम धुमाळ हे तिथे पाहणी करत होते. त्यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या वाहनाचा ताफा नाशिककडे जात होता. रस्त्यावर त्यांनी हा अपघात झालेला पाहून स्वतः याची पाहणी केली. तसेच घटनेची माहिती घेतली. कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप गीते आणि व्यवस्थापन टीमचे कार्य पाहून त्यांचे आभार मानले. तसेच कौतुकाचे दोन शब्द देखील दिले.

सदर घटनेत संजय मोरे यांचे निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना तात्काळ याची माहिती देखील दिली गेली. त्यांच्या कुटुंबीयांवर या घटनेने दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच घाटात गाडीवर नियंत्रण असणे. सावध गिरीने वाहन चालवणे हे किती गरजेचे आहे हे पुन्हा एकदा या अपघातातून समजते.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *